देवनदी
प्रकल्प – मूलगामी ग्राम्य विकास
एकीकडे
सा-या महाराष्ट्रात दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीच्या कारूण्यकथा प्रसिध्द होत
असतांना याला छेद देणा-या काही अनोख्या प्रयत्नांचीही एक आशेचा किरण म्हणून माहिती
घ्यायला हवी. जे प्रत्यक्ष या दुष्काळात होरपळताहेत ते सारेच सरकारी मदत वा
पॅकेजची वाट न बघता समोर ठाकलेल्या संकटाशी कसा सामना देताहेत याचे एक चांगले
उदाहरण सिन्नरसारख्या दुष्काळी तालुक्यातच बघायला मिळतेय. या प्रयत्नांतून लाभलेले
यश व स्वतःचा साधलेला सर्वांगीण विकास ही या प्रकल्पाची यशस्थळे असली तरी या
संकटातून बाहेर पडण्याचा खरा मार्ग कुठला हे अजूनही नेमके काय केले पाहिजे याबाबत
अंधारात चाचपडणा-या सरकारला एक दिशा व मार्गदर्शक ठरू शकेल एवढे सिध्द झालेले
सामर्थ्य या प्रकल्पात आहे हे निश्चितपणाने सांगता येते.
सिन्नर तसा
हा दुष्काळी तालुका समजला जातो. पावसाचे दुर्भिक्ष्य तर पाचवीलाच पूजलेले. अशा या
तालुक्यातील लोणारवाडी हे दिडशे दोनशे घरांचे गांव देवनदीच्या खो-यात दोन
टेकड्यांच्या बचक्यात वसलेले. सततच्या दुष्काळामुळे कोरडी होत गेलेली नदी व
त्यामुळे कमी कमी होत गेलेले बागाईत यामुळे गावकरी चिंतेत तर सारा गाव दारिद्र्याच्या
उंबरठ्यावर. गावातील शिकलेली मुले नजीकच्या एमआयडीसीत कामगार म्हणून नोकरीला जाऊ
लागली तरी गावातील काही हरहुन्नरी मुलांना काही तरी करावे असे प्रकर्षाने वाटत
होते व गावातील वयस्कर मंडळीनाही दुष्काळ असला तरी आपले गाव अशा बिकट व
विपन्नावस्थेला कधीच पोहचले नव्हते याची सारखी जाणीव होत होती. गावाच्या पारावरील
चर्चांमधून गावात पूर्वी इंग्रजाच्या काळातील फड व्यवस्थेचा शोध लागला व कुठल्याही
प्रकारे उर्जेची गरज न घेता केवळ ग्रॅव्हीटीवर याच नदीचे पाणी सा-या शिवारात
फिरवले जाऊन बागाईत होत असे अशीही माहिती पुढे आली. मात्र पुढे पंप व पाईप अशा उपसा
साधनांचा शोध लागताच ही नैसर्गिक व्यवस्था अडगळीत गेली व सा-यांनी आपापल्या
शेतातून विहिर बागाईत करत उपसा करायला सुरवात केली. कालांतराने याचा परिणाम
जमीनीतील पाण्याची पातळी खोलवर जाण्यात व सारे शिवार कोरडेढाक पडण्यात झाला. पूर्वी
मात्र फडात पाणी असतांना विहिरींना भरपूर पाणी असे व ते केवळ हातानेही घेता येई
अशी माहीती पुढे आली. या फड व्यवस्थेचा पाठपुरावा करणा-या गावातील तरूणांनी
इंग्रजांच्या काळच्या पाटांचे नकाशे शोधून काढले व वापरात नसल्यामुळे बुजल्या
गेलेल्या सारे पाट व चा-या परत खोदून काढल्या. हे सारे काम गावक-यांनी कुठलाही
मोबदला न देताघेता श्रमदानातून केले. ही व्यवस्था त्याही काळात एवढी प्रगत व
अद्ययावत होती की कुठल्या चारीवर किती क्षेत्र भिजते याचे मोजमाप करूनच त्या चारीत
पाणी सोडले जाई. त्यामुळे असलेल्या पाण्याचा पुरेपुर वापर व टंचाई काळातही
पाण्याची उपलब्धता ही या योजनेची वैशिष्ठे होती. ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर
परत सा-या शिवारात पाणी खेळू लागले व परत बागाईत पिकांची रेलचेल सुरू झाली.
आजच्या या
भीषण दुष्काळातही या खो-यातील पाण्याचे व हिरव्यागार पिकांची छायाचित्रे सोबत दिली
आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट अशी पारंपारिक पिके न घेता ज्या पिकांना बाजारात
चांगली किंमत मिळते अशीच पिके घ्यायचे प्रयोग या तरूणांनी राबवले आहेत. दुधाचा
धंदाही चा-याच्या उपलब्धतेमुळे चांगलाच फोफावला आहे. कांदा व भाजीपाला या नगदी
पिकांबरोबर शतावरी, ब्रोकोली, सिमला मिरची, डाळिंब अशी पिके घेत चांगले भाव
देणा-या हैद्राबाद व गोव्यासारख्या बाजारपेठा त्यांनी शोधून काढल्या आहेत. माल
पाठवल्यानंतर त्यांच्या खात्यावर ऑनलाईन जमा झालेले पैसे आजही सारे तरूण अभिमानाने
दाखवतात. जी तरूण मुले कामगार म्हणून अडीच तीन हजारावर काम करायची त्यांच्या
खात्यावर आज लाखो रुपये जमा दिसतात. एकेका कडे तीन तीन बँकाची क्रेडिट कार्डे आहेत
त्यामुळे त्यांना कुठल्या बँकेत कर्जासाठी खेटा मारव्या लागत नाहीत. उलट बँकाच
कर्जे घ्या म्हणून गावात चकरा मारत असतात. आज या तरूणांकडे अद्ययावत संपर्क साधनेच
नव्हे तर फॉर्चुनर पासून ते इनोव्हापर्यंतची सारी मॉडेल्स त्यांच्या दाराशी आहेत.
प्रत्येक मळ्यात अद्ययावत बंगला व त्यात सारी अत्यानुधिक साधने आहेत. सा-यांची
मुले सिन्नरच्या इंग्रजी माध्यमात शिकायला जातात. आम्हाला चहा घेऊन आलेली मुलगी
पुण्याला काँम्पुटर सायन्स मध्ये बी ई
करीत होती.
माल तयार
झाल्यावर कुठल्या बाजारपेठात काय भाव आहेत याचा अभ्यास करून तेथील व्यापा-याला आपल्या
मालाचे फोटो पाठवून काय दर देणार म्हणून निश्चित झाल्यानंतरच माल पाठवला जातो व
पैसे ऑनलाईन जमा होत असतात. आज गावात शेतीसाठी लागणा-या सा-या निविष्ठांचे स्वतःचे
दुकान आहे. सारा शेतमाल विक्रीत मदत करणारी देवनदी व्हॅली अग्री प्रोड्युसिंग
कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीचे शेतमालाची विक्री करणारे एक फिरते दुकान आहे.
स्वच्छ व ताजा भाजीवाला इलेक्ट्रॉनिक काट्यावर देणारे हे दुकान नाशिकच्या विविध रहिवासी
भागातून आपला शेतमाल चांगल्या दराने विक्री करीत असते. याच बरोबर या कंपनीने
कृषितज्ञ नोकरीला ठेवले असून ते सा-या पिकांबाबत सा-या शेतक-यांना योग्य ते
मार्गदर्शन करीत असतात. यात लक्षात आलेली महत्वाची बाब म्हणजे पूर्वी सा-या
शेतक-यांचा औषधे व किटकनाशकांवर जो भरमसाठ खर्च होत असे तो आटोक्यात येऊन
ग्राहकांनाही किमान वापर झालेली सुरक्षित उत्पादने मिळू लागली.
हा प्रकल्प
यशस्वी होण्यामागे गावक-यांनी काही महत्वाची पथ्ये पाळली त्यांचा परामर्ष घेणे फार
महत्वाचे आहे. या प्रकल्पात सरकार नामक व्यवस्थेची कितपत मदत झाली याची चौकशी केली
असता गावक-यांनी नकारात्मक सूर लावला. मात्र त्याचे भांडवल न करता आता जे काही
करायचे ते स्वबळावरच करावयाचे हे त्यांनी निश्चित केले व त्यादृष्टीने आखणी करत
वाटचाल सुरू केली. सरकारी योजना या प्रामुख्याने भाडवली गुंतवणुकीच्या असत व
तुम्ही हे घेतले तर तुम्हाला ते मिळेल अशा अनुत्पादक अटीशर्थींवर असे. अनुदाने
असलेल्या निविष्ठांच्या किमती अगोदरच वाढवलेल्या असतात व ही अनुदाने मिळवण्यात
अनेकांची पोटं भरावी लागतात. त्यामुळे शेतक-यांना त्याचा फारसा फायदा होत नसल्याचे
दिसून आले. यावरून एक मात्र सिध्द झाले की विकास व सरकार यांचे नेमके नाते काय
असते व विकास व्हायचाच असला तर सरकारची तशी फारशी गरज नसते. दुसरे महत्वाचे पथ्य
म्हणजे या सा-या विकास प्रक्रियेत गावक-यांनी राजकारण व राजकारण्यांना बिलकुल थारा
दिला नाही. सुरुवातीला सा-या राजकारण्यांनी या प्रयत्नांना त्यांच्या नेहमीच्या
पध्दतीने वेड्यात काढले होते व असा काय विकास होतो काय अशी शेरेबाजीही होत असे.
राजकारण न शिरण्याचे महत्वाचे कारण म्हणजे सा-या गावाने हद्दपार केलेला जातीयवाद.
तसे पहायला गेले तर सारा सिन्नर तालुका हा मराठा व वंजारी यांच्या राजकारणावर ओळखला
जातो. मात्र या गावात सारे मराठे व वंजारी सारे भेद विसरून केवळ विकासाचा घ्यास
घेत आपली आर्थिक उन्नती साधून घेत आहेत. बाहेरच्या कारणांमुळे गावात वितुष्ट येऊ
द्यायचे नाही यावर गावाचा कटाक्ष असतो.
आजच्या
राज्यातीलच नव्हे तर देशातल्या कृषि क्षेत्राच्या बिकट परिस्थितीच्या
पार्श्वभूमीवर ग्रामीणभागात नेमके काय केले म्हणजे काय निष्पन्न होते याचे चांगले
उदाहरण देणारा हा प्रकल्प आहे. या सा-या प्रयत्नांचा सखोल अभ्यास होत याची
पुनरावृत्ती करण्याच्या दृष्टीने काय करावे लागेल याबाबत पवईच्या आयआयटीने अगोदरच
ग्रामीण विकास योजनात या प्रकल्पाचा अंर्तभाव केला आहे. राज्यातील इतर भागातील
तरूणांनी या गावाला भेट देऊन नेमकी किती व कशी समृध्दी मिळवली आहे याचे
प्रात्यक्षिक बघावे व आपल्या भागातही तसे काही प्रयत्न करता येतात का हे बघावे.
सरकार आहेच व तसेच रहाणार आहे. त्याने काही तरी करायची वाट बघत आपण किती दिवस
विपन्नावस्थेत रहाणार ?
डॉ. गिरधर पाटील. Girdhar.patil@gmail.com


अप्रतिम, सुंदरलेख या आणि गावकऱ्यांचे सुंदर काम
उत्तर द्याहटवा