शनिवार, ९ एप्रिल, २०१६

भारतमाता की जय..नाही म्हणणार

अजिबात इच्छा नसताना हा विषय लिहावा लागतोय, कारण स्वातंत्र्यानंतर गेली ६0 वर्षे हा प्रश्न कधी उद्भवलाच नाही. 'वंदे मातरम्' म्हणणार नाहीवाली बनातवालांची पिढी गेली आणि त्यांना दम देणार्‍या मोठय़ा ठाकरेंची पिढीही गेली; पण विकासाचा मुखवटा लावून गोंडस भासणारे मुख्यमंत्री पक्षाच्या अधिवेशनात स्वत:चा भेसूर चेहरा दाखवतात, तेव्हा समाचार घ्यावाच लागणार.
भारतमाता की जय बोलणार नाहीत, त्यांना या देशात राहायचा अधिकार नाही! हे कोण बोलतंय? संघ स्थानावर वाढलेले आणि त्यांच्याच राजकीय फळी असलेल्या भारतीय जनता पार्टीचे नेते आणि सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

हे कोण भारत माता की जय म्हणा सांगणारे? इंग्रजांशी लढून, सनदशीर मार्गाने, अहिंसक क्रांती करून (काही क्रांतिवीरांच्या सशस्त्र क्रांतीसह) स्वराज्य मिळविले. १९४७ साली तिरंगा फडकवला, तेव्हा हे सगळे खाकी अध्र्या चड्डय़ा घालून, स्वतंत्र्य आंदोलनाकडे पाठ फिरवून आणि हिटलरकडे तोंड करून हिंदू राष्ट्रासाठी कवायत करत होते. जी काही तथाकथित 'भारत माता' हे सांगतात, तिची मुक्तता करताना हे नव्हतेच! आणि आता ही अरेरावी?

त्यानंतर मुंबईसह महाराष्ट्रासाठी आंदोलन झाले. मुंबईचा शेतकरी, कामगार यात प्राणपणाने लढला, स्वकियांच्या गोळ्या खाल्ल्या; पण मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव उधळला, तेव्हाही हे कुठेच नव्हते आणि आता त्याच मुंबईत, विधानसभेत सांगता, भारत माता की जय म्हणा? कुठल्या अधिकारात? ना या देशासाठी तुम्ही लढलात, ना महाराष्ट्रासाठी. तरीही वर ही शिरजोरी? लोक ऐकून घेताहेत, दुर्लक्ष करताहेत म्हणून वाट्टेल ते बोलत रहाल, वाद वाढवित रहाल, तर एक दिवस त्याचं असं उत्तर मिळेल की, भारत मातेचं दूध आठवेल.

का म्हणायचं आम्ही भारत माता की जय? आणि तुम्ही म्हणता म्हणून तर अजिबात नाही म्हणणार. तुमचा मनूचा डीएनए आता पॅथॉलॉजी लॅबमध्ये न जाताही दिसू लागलाय. महिला मंदिरात प्रवेश करणार म्हणून देव पाण्यात ठेवणारे तुम्ही, तुम्ही भारत मातेबद्दल बोलता? स्वत:च्या आईबहिणींच्या नैसर्गिक स्थितीला विटाळ मानून त्यांना देवदर्शन काय, घराबाहेर चार दिवस बसवणारे तुम्ही, तुम्ही भारतमातेबद्दल बोलता?

तुम्ही स्त्रीला शिक्षणाचा अधिकार नाकारलात, तिला सती चढवलेत, केशवपन करून विद्रुप केलेत, पुनर्विवाहास बंदी घालून, घरातल्या घरात तिला नासवलीत. तुमच्या या कर्तृत्वाची 'बाळंतपणं' फुले दाम्पत्यांनी केली. त्यांनी केशवपनाविरोधात न्हाव्यांचा संप घडविला आणि मुलींसाठी शाळाही काढली. हे सगळं होताना तुम्ही मनुस्मृतीसह तुमचा वैदिक धर्म, रुढी, परंपरा, सांभाळत सुधारकांवर अश्लाघ्य भाषेत बोलत शेण, दगड, विटांचा मारा करत होता आणि तुम्ही आम्हाला सांगता भारत माता की जय?

जगातली सर्वात अमानुष, राक्षसी प्रथा 'अस्पृश्यता' तुमच्या धर्माच्या चातुर्वर्णांची देन! माणसांचा विटाळ धरणारी, त्यांना शूद्र म्हणणारी, त्यांना शिक्षणाचाच काय प्यायच्या पाण्याचाही अधिकार नाकारणारी तुमची संस्कृती आणि धर्म, तरीही वाक्प्रचार काय तयार करता? तर अस्मानी आणि सुलतानी संकट! आजही इथल्या दलित, भटक्या विमुक्तांना ज्यांना जन्मजात गुन्हेगार मानले जाते, जे पोलिसी छळाचा बळी ठरतात, त्या सर्वांसाठी तुम्ही काय सुलतानी पेक्षा कमी आहात? आणि हे सर्व या मातीतले, तुम्ही बाहेरून आलेले, आजही 'ज्यूं'शी स्वत:ची तुलना करणारे तुम्ही, तुम्हाला अधिकारच काय कुणी काय बोलावं हे सांगायचा?

मुळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे नेमाडेंच्या कादंबरीतला मोठा मेंदू छोटा आणि छोटा मेंदू मोठा असलेला देशपांडे! या संघटनेला माध्यमही एवढं का महत्त्व देतात कळत नाही. त्याचे प्रमुख सरसंघचालक काही (ही) बोलतात आणि त्यावर प्रतिक्रिया उमटतात. कशाला यांना महत्त्व द्यायचं?

जी संघटना कुठलीच गोष्ट खुलेपणाने मान्य करीत नाही किंवा जबाबदारी घेत नाही, त्यांच्या म्हणण्याकडे कशाला गांभीर्याने बघायचं? भाजपा, अभाविप, वनवासी आश्रम ही सगळी यांचीच अपत्ये; पण वेळ झाली की आम्ही वेगळे, आमचे निर्णय आम्ही घेतो वगैरे गुळमुळीत उत्तरे. ती बाबरी पाडली. समोर अडवाणी, उमा भारती वगैरे सगळे उभे; पण कुणी म्हणायला तयार नाही आम्ही पाडली! नंतर गृहमंत्री झाल्यावर अडवाणींनी त्या खटल्यातून आपले पाय अलगद सोडवून घेतले! राम मंदिराच्या नावावर विहिंप आडून विद्वेष पसरविणे, पैसा जमवणे, विटा जमवणे, असले उद्योग केले. आज राम मंदिर ही प्रायॉरिटी नाही, पण ते आम्ही बांधणारच! कार्य काय संघाचं? वनवासी आश्रम? हे कधी झालं? जेव्हा बाबासाहेबांनी धर्मांतर केलं आणि बुद्ध धम्माची पुनस्र्थापना केली, तेव्हा यांच्या पायाखालची जमीन सरकली. नंतर नक्षलवादाने आदिवासीत स्थान मिळवलं. कम्युनिस्टांनी स्थान मिळवले तेव्हा यांनी 'आदिवासी' (म्हणजे मूळ निवासी) ही ओळख पुसून त्यांना 'वनवासी' (वनात राहणारा) अशी गोंडस ओळख दिली. त्यांच्या चालीरीती, देव, नाव बदलून त्यांचं ब्राह्मणी हिंदूकरण केलं. याला हे 'सेवा कार्य' म्हणतात! त्यासाठी परदेशस्थ ब्राह्मण नियमित निधी पाठवतात. त्यावर यांचे नव संस्कार वर्ग चालतात.

यांचं 'हिंदुत्व' हे शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यासारखं नाही, तर 'मावळ्यां'चा राजा, बारा बलुतेदारांचा राजा, कूळवाडी भूषण यांनी गोब्राह्मण प्रतिपालक केला! म्हणजे शिवाजी महाराज मोगलांशी जे लढले ते गायी आणि ब्राह्मण वाचवण्यासाठी! वर पुन्हा हे त्यांना राज्याभिषेक करायला नकार देणार आणि हे आता आम्हाला सांगणार भारत माता की जय म्हणा नाहीतर इथे राहू नका?

हिंदू धर्मावरची शेंडी जानव्याची धर्मांध, विषमता पसरवणारी सत्ता घालवण्यासाठी फुले, शाहू, आंबेडकर, सत्यशोधकी, आर्यसमाजी, महानुभव पंथ, प्रार्थना समाजिय, ब्राह्मो समाज, गोखले, आगरकर, कर्वे असे एकाहून एक सरस, अभ्यासू, परखड, विद्वान आणि सप्रमाण धर्मचिकित्सा करून पाखंडी आणि दांभिकपणा उघडी पाडणारी अशी ही चर्वाकापासूनची परंपरा. तुम्हाला तुकाराम, चोखा महार, सावता माळीही झेपले नाही आणि तुम्ही भारतमाता की जयची हुशारी दाखवता? किमान बोलण्याआधी आरशात तरी बघायचं?

इतके दांभिक, इतके बिनकण्याचे आणि शब्द फिरवणारे लोक जगाच्या पाठीवर कुठे नसतील. उठसूठ बाबासाहेब आणि संविधानाचे नाव घेतात. कोर्टात शपथपत्र देतात आणि नंतर मंदिरात जाणार्‍या महिलांना पोलिसी बळाने हाकलून देता? हे तुमचं बेटी बचाव, बेटी पढाव? हा तुमचा नारी सन्मान? आता त्या महान स्लोगन भूषण पंतप्रधानांना म्हणावं नवीन घोषणा द्या - बेटी बचाव, बेटी पढाव और मंदिर प्रवेश से रुकाव!

कसली, कुणाची भारतमाता? बैल कापला म्हणून माणूस कापला, दलित पोरगं लग्नात घोड्यावर बसलं म्हणून झोडपून काढता, मंदिरात प्रवेश करणार्‍या बायांवर पोलीस घालता? आणि यांच्या नादाला लागून गावोगावच्या बाया, या महिलांनाच शिव्याशाप, मार देताहेत. गावकरी बायांनो महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते आणि या तुमच्या रुढी परंपरा असत्या, तर आज तुम्ही सती गेला असता, नवरा मेल्यावर तुमचे केस भादरले असते. तुम्हाला शिक्षणाचा हक्क नसता, संपत्तीत अधिकार नसता. आज जे विश्‍वस्तपदी बसलात ती या महापुरुषांची देन तुमचा धर्म, तुमच्या रुढी, परंपरा यांच्या दृष्टीने तुम्ही काय होता माहितीय? पायातली वहाण! उठता बुक्की, बसता लाथ मारायची वस्तू, पोरं जन्माला घालायचं मशीन, नी माहेराहून सासरला आलं की तिथून चार खांद्यावरूनच बाहेर पडायचं. आज ज्या कॅमेर्‍यासमोर येऊन चुरूचुरू बोलताय ना, ज्या धर्मासाठी.. त्या धर्मासाठी तुम्हा पापयोनी, तुमची जीभ छाटायच्या लायकीची हे सगळं पारं 'जूनं' नाही. 'घटना' स्वीकारीपर्यंत चालू होतं. म्हणजे ५0-६0 वर्षेच झालीत. अजूनही यातल्या अनेक गोष्टी चालू आहेत. तुम्हीसुद्धा महार मांगाच्या लायकीच्याच या धर्मात! जरा चार बुक वाचा, नाहीतर आपल्या लेकीकडून वाचून घ्या आणि मग धर्म, रुढी, परंपरा आणि भारतमाता वाचवायला पदर खोचा. आजही नवर्‍यानं मारलं नी पावसानं झोडपलं, तर आसरा घ्यायला तरी देऊळ खुलं करून घ्या बायांनो. का कायम विहिरीच गाठणार?

देशातलं, राज्यातलं वातावरण ज्या उन्मादाने तापवलं जातंय, ते पाहून कोणाही विवेकी माणसाला यातना, चीड, संताप, दु:ख, हसू आणि आसू या क्रमाने उद्विगनता येईल; पण तुपकट चेहर्‍याच्या संघवाल्यांना त्याने अधिकच चेव चढेल, कारण काही घडवायचं नाही, बिघडवायचंही नाही फक्त सगळं विस्कटून टाकायचं हीच संघनीती. या अशा विकृत आनंदातच त्यांना समाधान असतं.

यानिमित्ताने आमच्या विकासाभिमूख मुख्यमंत्र्यांना जाहीर आव्हान द्यायचंय.

पंजाबच्या अकाली दलाला आणि काश्मीरच्या पीडीपीला भारत माता की जय म्हणायला लावा आणि मग आम्हाला इशारे द्या.

आणखी एक ज्या बाबासाहेबांनी आम्हाला हा देश 'नव्या धम्मासह दिलाय ते आम्ही भारतमाता की जय' नाही म्हणणार. बघूया काय करता ते!

जुनंच वाक्य सांगतो बुद्ध हाती घेतला म्हणून युद्ध नाही विसरलो.
 
 
 

1 टिप्पणी: