रामदेवबाबांचे उपोषण व इतरांची मळमळ.
जनलोकपाल विधेयकाच्या अण्णांच्या उपोषणावेळीच काही घटकांना पोटदुखी झाल्याचे जाणवत होते. आंदोलकांमध्ये नसलेली फूट जिवाच्या आकांताने दाखवण्याचा प्रयत्न जनमताच्या रेट्यापुढे टिकाव धरू शकला नाही. आताही त्याच पध्दतीने आंदोलकांना शाब्दिक चक्रव्युहात अडकवून ब्रेकींग न्युज मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न चाललाय. पंतप्रधान व सरन्यायाधीशांना जनलोकपाल विधेयकाला ‘रामदेवबाबांचा विरोध’ असा घोषा चालवण्यात खोटारडेपणा तर आहेच, परंतु पत्रकारितेचे मूलभूत संकेतही तुडवले जाताहेत. रामदेवबाबांचे विधान कोणाही सूज्ञ माणसाने ऐकले तर तोही असा विपर्यास करू शकणार नाही. ते म्हणाले की ‘पंतप्रधान वा सरन्यायाधीश यांना जनलोकपाल विधेयकाखाली आणावे की नाही हा एक गंभीर मुद्दा आहे आणि त्यावर देशपातळीवर व्यापक चर्चा व्हायला हवी.’ यात विरोधाचा सूर कुठे दिसतो, हे त्या हुषार पत्रकारितेलाच माहिती. मात्र अशा दिशाभूल करणा-या बातम्यांमुळे काही काळ सर्वसामान्यांचा गोंधळ उडत असला तरी कालांतराने तेही नंतर पितळ उघडे पडण्याच्या अनुभवावरून शहाणे होत जातात व अशा बातम्यांवर कितपत विश्वास ठेवायचा याचा विचार करतात.
याबाबतीत नकळत होणा-या चूका व अगदी पध्दतशीरपणे नियोजनबध्द कार्यक्रम हे निश्चितच लक्षात येतात. माध्यमांनी राबवलेल्या अशा अनेक मोहिमा दाखवता येतील. आपल्या सर्वच क्षेत्रात अशा चांगल्या वाईट प्रवृत्तींचा प्रवेश झालेला दिसून येतो व आपली माध्यमे त्याला अपवाद नाहीत. त्यामुळे माध्यमांमध्ये जे काही येते ते साधकबाधक वा शुध्दच येते असे मानण्याचे कारण नाही. खुल्या नजरेने व चाणाक्ष मनाने जेव्हा या मानसिक अतिक्रमणाकडे आपण पहायला शिकू तेव्हा या दिशाभूलीच्या लोंढ्यात वाहून न जाता ईप्सित स्थळी पोहचू असे वाटते.