अतुलनीय दुखण्याची दुसरी बाजू
अण्णांच्या आंदोलनाचे विश्लेषण करणारा अतुल कुलकर्णी यांचा निखळ लेख काही मुद्यांसाठी तरी अतुलनीय ठरावा. लेखाच्या प्रस्तावनेत या आंदोलनावर व्यक्त केलेला निखालस विश्वास आणि शेवटाला केलेली तशी कुणाच्याही लक्षात न आलेली राजकीय पर्यायाची गंभीर उपाययोजना या जमेच्या बाजू असल्यातरी मध्यभागात त्यांनी उपस्थित केलेल्या काही मुद्यांचा उहापोह होणे आवश्यक आहे. आंदोलनातून जाहिर झालेल्या काही वक्तव्यांबद्दल त्यांनी काही आक्षेप व्यक्त केले आहेत.
गोरे ब्रिटिश गये और काले ब्रिटिश आ गये, हे तसे नेहमीच वापरले जाणारे वाक्य आहे. यात राजकारणी, सरकारी व्यवस्थेत काम करणारा नोकरवर्ग विरूध्द सामान्य जनता असे शत्रुत्व नसून परके जाऊन आपले आले तरी परिस्थितीत बदल न पडण्याचे खरे कारण आपले वा परके हे नसून त्यांची व्यवस्था आहे तशीच स्वीकारल्याचे आहे हेच अभिप्रेत आहे. पारतंत्र्यात या व्यवस्थेला कारणीभूत असणारे परके इंग्रज हे शत्रु मानले जाणे स्वाभाविकच आहे. मात्र स्वातंत्र्यानंतर आपले आले तरीही परिस्थितीत तसा बदल होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर ते जाऊन हे आले तरी खरे कारण व्यवस्थेत कोण आहेत हे नसून मूळ व्यवस्थेतच असल्याचे लक्षात आले. आपले असोत की परके व्यवस्थाच अशी असावी की कुणाला तसे काही करायचा फारसा वाव राहू नये यासाठी ते गेले व हे आले तरी बदल न झाल्याने व्यवस्थाबदलाच आग्रह धरण्याच्या मानसिकतेला आणण्याचा तो एक प्रयत्न समजला पाहिजे. या आंदोलनाकडून अनेकवेळा जाहिर झालेले आहे की हे आंदोलन कुणाही व्यक्तीच्या, पक्षाच्या वा सत्तेच्या विरोधात नाही. आम्हाला अशी व्यवस्था अभिप्रेत आहे की कुणीही व्यक्ती, पक्ष वा सत्ता यांना मुळात काही गैरप्रकार करायला वावच राहू नये. हे करतांना यात कोण कुणाशी वैरत्व वा शत्रुत्व निर्माण करतोय असे समजण्याचे काही कारण नाही. सद्या आपला ज्या व्यक्तीं, पक्ष वा सत्तांशी संबंध येतोय ते सारे निश्चितच चंद्रावरून आलेले नाहीत, परंतु त्याना ज्या संधि या व्यवस्थेतच उपलब्ध झाल्याने स्वार्थाच्या मानवी मूलभूत प्रेरणा लक्षात घेता अशा संधि किमान वा मर्यादित ठेवणारी व्यवस्था अपेक्षित आहे. यात आपापसात वैर निर्माण होण्याचा काही प्रश्न नाही.
पुढे अतुल कुळकर्ण्यांनी व या अगोदरही अनेकदा व्यक्त झालेला सामान्य माणसाचा भ्रष्टाचारातील सहभागाचा आरोप या लेखातही आला आहे. यात नेहमीच कोणावर एक बोट दाखवतांना तीन बोटे आपल्याकडे वा सुरूवात पहिल्यांदा स्वतःपासूनच करा अशा अज्ञानमूलक सल्यांचा समावेश असतो. माझ्या मते हा सर्वसामान्यांचा जाहिर अपमान तर आहेच पण भ्रष्टाचा-यांच्या हातात एक कोलीत देण्याचाही अष्लाघ्य प्रयत्न यात दिसतो. यात व्यक्त होणारी भावना म्हणजे सर्वसामान्य हा बाय डिफॉल्ट भ्रष्टाचारी असतो, आनंदाने ऊठसूट भ्रष्टाचार करायला नेहमीच उत्सुक असतो आणि त्याच्यामुळेच हा भ्रष्टाचाराचा भष्मासुर निर्माण झाला आहे. प्रत्यक्षात पाहू जाता सर्वसामान्य हा भ्रष्टाचाराचा बळी असतो, या व्यवस्थेत असण्याबद्दलची त्याला ती एक शिक्षा असते व त्यातून वाचण्यासाठी नकोशी वाटली तरी केलेली एक तडजोड असते. भ्रष्टाचार नाकारणे वा स्वीकारणे हे सर्वस्वी पर्याय नसल्याने त्याच्या क्षमतांपलिकडचे असते कारण प्रत्यक्ष अस्तीत्वाच्या लढ्यात जगतांना नैतिकतेपेक्षा व्यवहार वरचढ ठरतो. भ्रष्टाचारी जसा आपल्या स्वार्थाच्या प्रेरणेला जागत वागत असतो, त्याच तत्वानुसार सर्वसामान्य व्यवहारवादी होत बळी जात असतो. यात त्याचा दोष मानून त्याला उपदेश करणे सर्वस्वी गैरलागू ठरते.
राजकारण वाईट समजले जाते याची कारणेही त्यांनी दिली आहेत. राजकारणात अयोग्य माणसे घुसवण्याला सर्वसामान्यच कारणीभूत असल्याचे काही प्रमाणात खरे असले तरी राजकारण व राजकारण्यांची अशी प्रतिमा व्हायला सर्वसामान्यच कारणीभूत आहेत असे मानणे अन्यायकारक ठरेल. मुळात गत काही काळात चांगल्या राजकारणाला मिळणारा अवकाश वा वाव संकुचित होत गेल्याने राजकारणात काही चांगले घडेल याची आशा न राहिल्याने सर्वसामान्यांची अशी भावना होणे स्वाभाविक आहे. राजकारणात चांगल्या माणसांनी यावे हाही एक विनोद आहे. राजकारण हे चांगुलपणा वा वाईटपणा यापेक्षा तुमच्या या प्रवृत्तीना वाढ देणारे आहे की मर्यादित करणारे आहे हे ठरवणा-या व्यवस्थेवर अवलंबून आहे. आणि या व्यवस्थाबदलालाच खरा विरोध होतो आहे. यावर सध्यातरी कायदा हे एकमेव हत्यार उपलब्ध असल्याचे दिसते. नैसर्गिक परिवर्तनाव्यतिरिक्त एकादा परिणामकारक उपाय सुचवल्यास नक्कीच विचार करता येईल.
स्वातंत्र्याचा दुसरा लढा यालाही त्यांचा आक्षेप आहे. स्वातंत्र्य हे केवळ परक्यांपासूनच मिळवावे लागते असे त्यातून ध्वनित होते. मुळात स्वातंत्र्य ही एक मूलभूत प्रेरणा आहे व तीत कोणापासून स्वातंत्र्यापेक्षा कशापासून स्वातंत्र्य याचा विचार महत्वाचा आहे. याचा खोलवर विचार केला असता स्वातंत्र्याचा प्रवास हा बाह्य बंधने झुगारत आपणच आपल्यावर लादलेल्या बंधनांपासून मुक्ती इतका व्यापक असल्याने हा लढा कितवा व कुणाशी आहे याला फारसे महत्व रहात नाही.
भ्रष्टाचाराची व्याख्या करण्याचाही एक सापळा आहे. सर्वसामान्यांना गोंधळात टाकण्याचा एक प्रभावी मार्ग. भ्रष्टाचाराची प्रेरणा एवढी खोल व सर्वव्यापी आहे की कशाला या भानगडीत पडता, आहे तसे चालू द्या असाही सर्वसामान्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यात दिसतो. मला असाध्य आजाराने ग्रासले आहे हे एकदा पटवून दिले की जगण्याचा प्रयत्न करणे किती फोल आहे असे सांगण्यासारखे आहे.
म. गांधीनी दिलेल्या सक्रिय कार्यक्रमाचा उल्लेख करून तसा कार्यक्रम या आंदोलनाकडे नसल्याचे म्हटले आहे. त्यांच्या माहितीसाठी सांगतो १९९५ पासून मी या आंदोलनात आहे. या आंदोलनात सहभागी होणा-या प्रत्येकाला मी भ्रष्टाचार करणार नाही व करू देणार नाही अशी जाहिर शपथच नव्हे तर लिहून द्यावे लागते. याची अमलबजावणी त्याला मिळणा-या अवकाशावर अवलंबून आहे कारण म. गांधींनीही कार्यक्रम दिल्यावर सारा देश सूतकताईला बसला असे झाले नाही. देशाचे जाऊ द्या खुद्द कॉँग्रेसमध्येच गांधी विचार किती मानला जातो हे बघावे लागेल.
आंदोलनाला विरोध करणारा तो भ्रष्टाचारी, देशद्रोही वा काँग्रेसचा हस्तक अशी भावना बळावल्याचे खरे म्हणजे काही कारण नाही. तशा मुळे आंदोलनावर टीका झाली नाही असेही नाही. विशेषतः मराठी वृत्तपत्रांतून आंदोलन विरोधीच सूर लावला गेला. बातम्या तर द्याव्या लागतात, कारण ती घटिते असतात. मात्र विश्लेषण पूर्णतः नकारात्मक. त्यालाही आंदोलनातर्फे उत्तर द्यायचा प्रयत्न झाला नाही. कारण छापून येणे दुरापास्त होते. व्यवस्थेवर कोरडे मारण्याचा हक्क केवळ आमचा आहे व महत्प्रयासाने जोपासलेल्या व जपलेल्या अधिकारावर आपले व्यवस्थारक्षक सहजासहजी इतरांना वाव देत नाहीत हेही या निमित्ताने लक्षात आले. या आंदोलनामुळे या विचारवंतांची गोची झालेली दिसते. आपल्या भूमिके विपरित असे का घडते आहे हे भल्याभल्यांच्या लक्षात आले नाही. त्यातल्या त्यात अतुल कुळकर्ण्यांचा लेख निखळ व प्रामाणिक वाटल्यानेच त्यावर दोन शब्द लिहायचा हा प्रयत्न.
डॉ. गिरधर पाटील. Girdhar.patil@gmail.com